स्मार्ट मीटरमुळे वीजवापरावर ग्राहकांना मिळाली साडेचार कोटींची सवलत

Foto
पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक
आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. घरगुती ग्राहकांना २०२५ च्या जुलै महिन्यापासून सवलत मिळत आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली. जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. यंदा ही सवलत ८५ पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षात ती वाढत जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात २ लाख ७५ हजार ३४ घरगुती ग्राहकांना जुलै-२०२५ ते जून २०२६ या १२ महिन्यांच्या वीजबिलात ४ कोटी ५९ लाख ९ हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ७५ हजार ६८१ ग्राहकांना १ कोटी ८७ लाख ५७ हजार रुपये, छत्रपती
संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १ लाख ४० हजार १३४ ग्राहकांना १ कोटी ८४ लाख ७८ हजार रुपये तर जालना मंडलातील ५९ हजार २१९ ग्राहकांना ८६ लाख ७५ हजार रुपये सवलत मिळाली. विजेचा वापर दर तासाला मोबाईलवर पाहता येते. त्याद्वारे वीजवापरावर नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. हे मीटर प्री-पेड नसून पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळत आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions